कृषी विभागाच्या विविध योजनांमधील थकीत अनुदान थेट खात्यात जमा; आचारसंहिता असूनही वितरण प्रक्रिया सुरू.
अनुदानासाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी पात्र ठरलेल्या आणि गेल्या अनेक दिवसांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक अपडेट आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजना (जसे की कृषी यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, बी-बियाणे योजना) या महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. या योजनांतर्गत ज्या शेतकऱ्यांना पूर्वीच पूर्वसंमती मिळाली होती, ज्यांनी बिल चलान अपलोड केले होते, परंतु निधीअभावी ज्यांचे अनुदान थांबले होते, त्यांना अखेर आता अनुदानाचे वितरण व्हायला सुरू झाले आहे.
निधी उपलब्ध झाल्याने वितरणाला वेग
मागील काही दिवसांपासून अनुदानाच्या वितरणासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे राज्यातील हजारो शेतकरी प्रतीक्षेत होते. महाडीबीटी फार्मर स्कीमवर सुमारे २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीच्या लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि यापैकी जवळजवळ ३०० ते ४०० कोटी रुपयांचा निधी वितरणासाठी थकीत होता. अनुदानाचे वितरण न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत होता. त्यामुळे कृषिमंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून तातडीने निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. याच पाठपुराव्याच्या अनुषंगाने आता निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, पात्र शेतकऱ्यांचे थकीत असलेले अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट क्रेडिट व्हायला सुरुवात झाली आहे.

